मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल!

मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई /17 ऑक्टोबर : शिवाजीपार्कवर मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयांचा मनोमीलन सोहळा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल, अशा शुभेच्छा देत उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत एकत्र राहणार असल्याचे संकेत दिले. शिवाजीपार्क आणि ठाकरे हे समीकरण दीपोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्रित उपस्थितीने पुन्हा जुळले.

कार्यक्रमाची उपस्थिती दोघांच्या एकाच गाडीतून प्रवेशाने झाली. त्यांच्यासोबत आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे, मिताली ठाकरे ही सर्व भावंडेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कवर दाखल झाली. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे तसेच राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्यातील नात्यांचा धागा अधिक घट्ट झाल्याचे दिसले. अनेक वर्षांनंतर ठाकरे कुटुंब अशा प्रकारे एकत्र एका सोहळ्यात पाहण्याचा योग जुळला. तीन महिन्यांत सातव्यांदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची एकत्र भेट झाली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि ही दिवाळी वेगळी आणि विशेष असल्याचे सांगितले. मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांना आनंद देत राहील, असे म्हणत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र राहण्याचे संकेत दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button