सदावर्तेंच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
एसटी बँकेच्या कार्यालयात राडा

मुंबई /15 ऑक्टोबर : मुंबईत आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना (शिंदे) यांचे कार्यकर्ते एसटी बँकेच्या कार्यालयात जोरदार हाणामारी करताना दिसले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुंबईतील एसटी बँकेच्या कार्यालयात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, आणि हाच मुद्दा बैठकीत गोंधळास कारणीभूत ठरला. शिवसेना (शिंदे) नेते आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाचा संप केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही आणि त्यातील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. लोकांना सदावर्ते यांची कार्यपद्धती रुचली नाही, त्यामुळे अनेकजण त्यांच्या युनियनमध्ये परत आले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या मते, एसटी कामगारांची संघटना आणि एसटी बँकेची युनियन ही त्यांच्या देखरेखीखाली आहे. सदावर्ते यांचे पॅनल निवडून आले आहे, परंतु त्यांनी अनेक गैरव्यवहार केले असून, त्याला कंटाळून काही सदस्य त्यांच्या बाजूला आले आहेत. आनंदराव अडसूळ यांनी आरोप केला की, सदावर्ते यांच्या कारभारामुळे लोक सुरक्षित वाटत नाहीत आणि त्यांनी विविध माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे. एसटी बँकेत १२५ कर्मचार्यांची भरती करण्यात आली असून, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, ज्याला संघटनेच्या माध्यमातून स्थगिती आणली असली तरी त्यांनी भरती सुरू ठेवली आणि त्यातून पैसे कमावले. तसेच, १२ कोटींचे सॉफ्टवेअर त्यांनी थेट ५२ कोटींना खरेदी केले, असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
* महिला कर्मचार्याशी अश्लील वर्तन ?
मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सदावर्ते आणि शिंदे गटाच्या पॅनलनचे सर्व संचालक उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले. यावेळी सदावर्ते यांच्या पॅनलच्या व्यक्तीकडून महिला कर्मचार्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अडसूळ यांच्या संचालकांच्या दिशेला बॉटल फेकून मारली. त्यानंतर या बैठकीत मोठा राडा झाला. या हाणामारीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले.




