भाजपची 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
9 महिलांना तिकीट, अनुभवी चेहर्यांना पुन्हा संधी

पाटणा /14 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करणे टाळले आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत एकूण 71 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बहुचर्चित मैथिली ठाकूर आणि पवन सिंह यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. भाजपने जाहीर केलेल्या 71 उमेदवारांपैकी 9 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपने अनुभवी आणि बड्या नेत्यांच्या कामगिरीवर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे, तर काही माजी मंत्री आणि यापूर्वी विजयी ठरलेल्या काही आमदारांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूरमधून उमेदवारी देण्यात आली असून, माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना बेतिया विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय मंत्री नितीन नवीन यांना बांकीपूर, मंगल पांडे यांना सिवान आणि संजय सरावगी यांना दरभंगा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर नीरज कुमार बबलू हे छातापूरमधून निवडणूक लढवणार आहेत.




