सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली/10 ऑक्टोबर : भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते, त्यामुळे पुढच्या काही दिवसांत मुनगंटीवार यांना पक्षाद्वारे महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेतली. सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी दिल्ली दौर्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी विविध नेत्यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील काही प्रश्न आणि त्या संदर्भातील निवेदनं अमित शाह आणि इतर संबंधित मंत्र्यांना द्यायची होती. या भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात लवकर येण्याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, “राजकारणात काही मिळावे म्हणून मी आलेलो नाही; मंत्रीपदासाठी वगैरे मी दिल्ली दौरा केला नाही.”




