राज्यातील विद्युत कर्मचार्‍यांचा संप स्थगित

वीज ग्राहकांना मोठा दिलासा

* 14 ऑक्टोबरला कृती समितीच्या संघटनाच्या सदस्याबरोबर व्यवस्थापनाची बैठक

मुंबई /10 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीने विविध मागण्यांसह तीनही वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखण्यासाठी राज्यात 72 तासांचा संप पुकारला होता. मात्र व्यवस्थापनाने कृती समितीतील संघटनांना केलेल्या आवाहनाचा आदर राखून 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी समितीबरोबर वाटाघाटीसाठी तारीख निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीने संप स्थगित केला असल्याचे त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात अदानी, टोरेंटो यांसारख्या खासगी भांडवलदारांनी वीज वितरणाचे परवाने मागितले, त्यास विरोध, महावितरण कंपनीत पुनर्रचना, कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्र खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्रांचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनीच्या 200 कोटी प्रकल्पांचे खासगी कंपन्यांना हस्तांतरण, पारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, वीज कर्मचार्‍यांसाठी पेन्शन योजना लागू करणे, लाईन स्टॉप व इतर कर्मचार्यांचे कामाचे आठ तास निश्चित करणे, रिक्त पदे मागासवर्गीय आरक्षणासह भरणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे धोरणात्मक निर्णय घेणे आणि पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचार्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृती समितीने तीन दिवसांचा संप पुकारला होता.तथापि, उर्जामंत्री, एम.एस.ई.बी. होल्डिंग कंपनी, महाजन्को, महावितरण आणि महाट्रान्स्को या विद्युत विभागातील कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी समितीच्या सातही संघटनांच्या सदस्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कृती समितीने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button