मुख्यमंत्र्यांनी योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी

अन्यथा अनिल परब यांचा इशारा

मुंबई /9 ऑक्टोबर : पुण्यातील गुंड निलेश घायवळच्या भावाला, सचिन घायवळला, पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता. मात्र, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने हा मुद्दा उचलून विरोध व्यक्त केला असून, योगेश कदम यांच्यावर कारवाई होऊन हकालपट्टी केली जावी अशी मागणी करत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज (09 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला की, योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरू शकते. परब म्हणाले की, “अशा लोकांना किती दिवस वाचवणार आहात? हे लोक डान्सबार चालवतात, नाचवणी भाडे खातात, दलाली करतात आणि गँगस्टर लोकांना पोसण्याचे काम करतात. अधिकृत शस्त्र परवाने गँगस्टर लोकांना दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर का डोळा झाकला आहे, हे समजत नाही. जर कारवाई झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरावी लागेल.”

अनिल परब म्हणाले की, ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत आणि योगेश कदम यांची हकालपट्टी करण्याची मागणी करतील. “अधिवेशनात आवाज उठवू, पण रस्त्यावर देखील उतरू. मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्यावर उतरण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. योगेश कदम हकालपट्टी न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. योगेश कदम यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पहिली संधी दिली जाईल; मात्र कारवाई झाली नाही, तर पुढील पाऊलं उचलली जातील,” असे परब यांनी सांगितले.

याशिवाय, अनिल परब म्हणाले की, योगेश कदम यांचे डान्सबार, वाळूचोरी आणि इतर प्रकरणे घेऊन ते लोकायुक्तांकडे जाणार आहेत. पोलिसांच्या अहवालानुसार, सचिन घायवळ गुंड आहे आणि समाजविरोधी कृत्यांमध्ये सहभागी आहे; त्यामुळे शस्त्र परवाना नाकारला होता. परब यांनी म्हटले की, या आधारावर योगेश कदम यांनी देखील परवाना नाकारला असता, असे योग्य झाले असते.

संबंधित बातम्या

Back to top button