वकील राकेश किशोर यांची खा.निलेश लंकेंनी घेतली भेट
सरन्यायाधीश गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणार्या

* भारतीय संविधानाची प्रत भेट दिली
नवी दिल्ली/9 ऑक्टोबर -सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी (6 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात 71 वर्षीय वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून, राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांचे बार कौन्सिलचे तात्पुरते सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. या कृतीबद्दल देशभरातून तीव्र टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी वकील राकेश किशोर यांची भेट घेतली आहे.खासदार निलेश लंके यांनी आज दिल्ली येथे राकेश किशोर यांची भेट घेतली आणि त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तसेच संविधानाची प्रत भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांनी भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान निर्माण केले. संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत जो प्रकार घडला, तो एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अवमान आहे.”लंके पुढे म्हणाले, “जे कृत्य घडले त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन येथे आलो आहे. राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारांमधून प्रेरित आहे. त्यांना संविधानाचा विसर पडला आहे, आणि त्याची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी मी ही भेट घेतली आहे.”




