मुंबई 8 ठिकाणी ईडीची छापेमारी
फैसल शेख आणि अल्फिया शेख यांचे नेटवर्क उद्ध्वस्त

मुंबई /8 ऑक्टोबर : ईडीने आज, 08 ऑक्टोबर, सकाळी ड्रग्ज नेटवर्कवर मोठी छापेमारी केली आहे. ईडीच्या मुंबई झोनल ऑफिस-1च्या पथकाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत शहरातील आठ ठिकाणी छापे टाकले. हे छापे फैसल जावेद शेख आणि अल्फिया फैसल शेख यांच्या ड्रग्ज नेटवर्कशी जोडलेले आहेत. ईडीला संशय आहे की, दोघांनी ड्रग्ज तस्करीतून मोठी रक्कम कमावली असून मनी लाँड्रिंगद्वारे ती वैध करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, ईडीने केरळमधील 17 ठिकाणी देखील छापेमारी केली आहे.
ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की, फैसल शेखने कुख्यात ड्रग्ज पुरवठादार सलीम डोलाकडून एमडी (मेफेड्रोन) खरेदी केले होते. सलीम डोला हा ड्रग्ज तस्करीच्या जगात एक प्रमुख व्यक्ती असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बराच काळ फरार असलेल्या सलीम डोलाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कला निधी पुरवण्यात सहभाग असल्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केले होते.
ईडीचे पथक सध्या अशा ठिकाणांची चौकशी करत आहे, जिथे ड्रग्ज मनी आणि संबंधित मालमत्तांचे पुरावे सापडण्याची शक्यता आहे. अधिकार्यांच्या मते, या नेटवर्कने कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर उत्पन्नाला वैध करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील ड्रग्ज आणि हवाल्याच्या खोलवरच्या संबंधांना उघड करण्यासाठी ही कारवाई एक प्रमुख दुवा मानली जात आहे, कारण सलीम डोला हा दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आहे. जूनमध्ये भारतीय तपास संस्थांनी त्याला दुबईहून भारतात प्रत्यार्पण केले होते.




