सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

बूट फेकून मारण्याचा प्रयत्न

* आरोपी अ‍ॅड.राकेश किशोरला अटक

* देशभरातून घटनेचा तिव्र शब्दात निषेध

* म्हणाला सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही

नवी दिल्ली/6 ऑक्टोबर – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधून या वकिलाला अडवले आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. हा वकील सरन्यायाधीशांवर संताप व्यक्त करत त्यांच्याजवळ पोहोचला आणि बूट काढू लागला. तो बूट फेकण्याच्या तयारीत असताना सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. या वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा स्वरुपाच्या घोषणा दिल्या.

अलीकडेच विष्णू मंदिरासंदर्भातील एका प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्याला सांगितले होते की, “तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा.” त्यावर काही लोक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत न्यायाधीशांवर टीका केली होती. याच वक्तव्याचा संताप व्यक्त करत वकिलाने आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना थेट सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील सुरक्षारक्षकांनी वेळेवर हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी या घातक घटनानंतरही न्यायालयाचं कामकाज थांबवले नाही. त्यांनी कार्यवाही चालू ठेवण्याचं आवाहन केलं आणि सांगितलं की, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.”

विष्णू मंदिरासंदर्भातील प्रकरण मध्यप्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिराशी संबंधित आहे. याचिकाकर्त्यांनी सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी नवीन मूर्ती बसवण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर रोजी ही याचिका फेटाळून लावली, कारण हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित येते. सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी सांगितले की, “तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात, मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. खजुराहो मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते, आणि पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ शकत नाही, याबाबत खेद वाटतो.”

* कोण आहे राकेश किशोर?

71 वर्षीय राकेश किशोर हे दिल्लीतील मयुर विहार भागात राहणारे वकील आहेत. त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टातील वकील व लिपीकांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड देखील होते. या घटनेनंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांना तत्काळ निलंबित केले आहे. निलंबनानंतर त्यांना देशभरातील कोणत्याही कोर्टात न्यायालयीन कामकाजात सहभागी होणे शक्य नाही. किशोर हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सदस्य असून, या घटनेनंतर बार असोसिएशननेही किशोर यांच्या कृत्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button