निबंधक कार्यालयावर बावनकुळेंची धाड
लाचखोरी उघड, रोकड जप्त

* पैसे सापडल्याने पोलिसांना केले पाचारण
नागपूर/6 ऑक्टोबर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी दुपारी अचानक खामला परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी एका अधिकार्याच्या टेबलवरील ड्रॉवरमध्ये काही पैसे आढळल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले, ज्यामुळे अधिकारी व कर्मचारी खळबळले. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, हे पैसे व्यक्तिगत आहेत की रजिस्ट्री संदर्भात संबंधितांकडून घेतलेले आहेत, याची चौकशी पोलीस करतील आणि सरकार पुढील कारवाई करेल. बावनकुळे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; तीस लाखांहून अधिक रकमेच्या व्यवहार करताना आयकर विभागाला माहिती देणे बंधनकारक असताना ती दिली जात नाही. तसेच प्रत्येक रजिस्ट्रीमागे पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात.
बावनकुळे यांनी सांगितले की, सर्व व्यवहार राज्य सरकारने ऑनलाईन केले असूनही, पैशाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात नेमलेले एजंटमार्फत केला जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांसह आज कार्यालयात आले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, राज्यभरात कुठेही अशा प्रकारचा गैरव्यवहार होत असल्यास थेट त्यांना व्हाट्सअॅपवर संपर्क साधावा व तक्रार करावी. यावेळी सापडलेले पैसे संबंधित अधिकार्यांचे व्यक्तिगत आहेत की गैरमार्गाने आलेले आहेत, याविषयी गूढ कायम आहे.
महसूल विभागात शेतकरी आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो असे नेहमीच तक्रारीत दिसते. ग्रामपंचायत, तलाठी ते तहसीलदार स्तरावर नागरिकांना त्रास दिला जातो, तसेच खरेदी-विक्री कार्यालयातही अतिरिक्त पैसे मागितले जातात, अशी अनेकदा तक्रारी येतात. नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातही विविध कामांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. पैसे न दिल्यास लोकांचे काम होत नव्हते आणि प्रत्येकाकडून पाच ते आठ हजार रुपये घेतले जात होते. अनेक एजंट येथे काम करत असल्यामुळे जनतेला न्याय देण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी बावनकुळे यांनी धाड मारली. झाडाझडतीत कामांमध्ये अनियमितता आढळून आली आणि एका ड्रॉवरमध्ये पैसे सापडले. त्यामुळे या प्रकरणात गंभीर कारवाई होणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया असूनही असे प्रकार घडत असल्याने बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली.




