कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान एकनाथ शिंदेंनाच

मंदिर समितीची निर्णय

सोलापूर /6 ऑक्टोबर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मोठा मेळावा भरतो. दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात, तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री पूजा करतात. परंतु सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे या पूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता.

याबाबत मंदिर समितीकडून निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीच्या अधिकाऱ्याने जाहीर केले की कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला जाणार आहे. त्यामुळे पूजेचा प्रश्न मार्गी लागला असून, विधी आणि न्याय विभागाच्या मार्गदर्शनानंतर पंढरपूर मंदिर समिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी निघणार आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे कोणाला पूजेचे निमंत्रण द्यावे, हा प्रश्न पंढरपूर मंदिर समितीसमोर निर्माण झाला होता. त्यावर रविवारी (ता. 5 ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर विधी व न्याय विभागाने पुष्टी केली की कार्तिकी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडेल. महत्त्वाची बाब म्हणजे कार्तिकी एकादशी 1 नोव्हेंबरला असणार आहे. या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर आचारसंहिता लागू असल्यास, निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊनच पूजा पार पडेल.

संबंधित बातम्या

Back to top button