22 ऑक्टोबरपासून विठ्ठलाचे दर्शन 24 तास
कार्तिकी यात्रेत भाविकांना सर्व सुविधा

पंढरपूर /5 ऑक्टोबर : कार्तिकी यात्रेला राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. या भाविकांना सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज आहे. कार्तिकी यात्रेच्या पोशर्भ मूर्तीवर 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन 24 तास उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज आसैकर यांनी दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
यात्रेपूर्व नियोजनासाठी मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे झाली, ज्यात सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनशे कुमार कदम, सभाज्ञी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेेश्वर देशमुख (जळगाव), डॉ. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश ज्वाळाळ, ह.भ.प. शिवाजीराव मारे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्त्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी सांगितले की, रविवार, 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणींचे सुरळीत आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी परंपरेनुसार 26 ऑक्टोबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मंदिर जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




