नक्षलवाद्यांची दोन स्मारके उद्ध्वस्त
अतिदुर्गम कटेझरीत गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली /1 ऑक्टोबर : नक्षलवाद्यांकडून दुर्गम भागात दहशत निर्माण करून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. कटेझरी पोलीस ठाणे हद्दीतील मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात दोन ते तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी उभारलेली दोन स्मारके जिल्हा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे नक्षलवादी कारवायांना धक्का बसला असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 30 सप्टेंबरला कटेझरी पोलीस ठाण्याचे पथक व एसआरपीएफचे जवान जंगल परिसरात शोधमोहीम राबवित असताना ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद ठिकाणी बीडीडीएस पथकाने तपासणी करून ही स्मारके पाडण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्मारकांचा नायनाट करून त्याठिकाणी शांततेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. पोलिसांनी उपस्थित गावकर्यांना आवाहन केले की, नक्षलवाद्यांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करून गावाचा विकास साधावा. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दल नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. समाजात अशाप्रकारच्या स्मारकांना कुठेच स्थान नाही, त्यामुळे अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये कोणीही सहभागी होऊ नये. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, अधीक्षक गोकुल राज जी तसेच सहाय्यक अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.




