सरकारी कर्मचार्यांना केंद्राची दिवाळी भेट
महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

नवी दिल्ली/1 ऑक्टोबर : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ जाहीर केली आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या आधी बुधवारी (1 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल आणि थकबाकी ऑक्टोबर 2025 च्या पगारासह भरली जाणार आहे. यामुळे डीएचा दर मूळ वेतन आणि पेन्शनच्या 55 टक्क्यांवरून 58 टक्के होणार आहे. 2025 मध्ये ही दुसरी वाढ आहे. महागाई भत्ता (DA) आणि DR हे पगार आणि पेन्शनचे महत्त्वाचे घटक असून सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये या भत्त्यांमध्ये सुधारणा करत असते. त्यामुळे सरकारी कर्मचारी जुलैपासून याची आतुरतेने वाट पाहत होते. आता, दिवाळीच्या काही दिवस आधी, सरकारने त्यांना ही भेट दिली आहे.




