सहा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ
गव्हाची प्रति क्विंटल 160, करडई 600 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली/1 ऑक्टोबर : केंद्र सरकारने बुधवारी रब्बी मार्केटिंग हंगाम 2026-27 साठी सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये गव्हाच्या सध्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 160 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ही एमएसपी वाढ मंजूर करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने रब्बी पिकांची 2026-27 च्या मार्केटिंग हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे, जेणेकरून शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य किंमत मिळेल. किमान आधारभूत किमतीमध्ये सर्वाधिक वाढ ही करडईसाठी प्रति क्विंटल 600 रुपये करण्यात आली आहे, त्यानंतर मसूरसाठी प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ झाली आहे. मोहरी, हरभरा, बार्ली आणि गहू या पिकांसाठी अनुक्रमे प्रति क्विंटल 250 रुपये, 225 रुपये, 170 रुपये आणि 160 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकृत निवेदनात दिली गेली आहे.




