स्टील प्लांटमध्ये दुर्घटना; 6 कामगारांचा मृत्यू
अनेक जण दबल्याची भीती

* बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जखमी रुग्णालयात दाखल
रायपूर /26 सप्टेंबर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली असून, त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या सिलतारा औद्योगिक क्षेत्रातील गोदावरी इस्पात लिमिटेड या स्टील प्रकल्पात शुक्रवारी ही दुर्घटना घडली. प्लांटमध्ये दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरू होते आणि ते पूर्ण झाल्यानंतर पाहणीसाठी गेलेल्या कर्मचार्यांवर प्लांटचा काही भाग कोसळला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले, परंतु जखमींचा निश्चित आकडा आणि दुर्घटनेचा नेमका कारण अद्याप ठोसपणे समजू शकलेले नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार काही कामगार दबले गेले असण्याची भीती आहे, त्यामुळे मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच रायपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी पोहोचली. दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे रायपूर जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. जखमींना रायपूरच्या जिल्हा आणि मेकाहारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र ढिगार्याखाली नेमके किती कामगार दबले आहेत, याची निश्चित आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही.




