रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठासाठी 38 पदांना मंजुरी

कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह अनेक जागांवर भरती

* उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे शासन निर्णय जारी

पुणे /24 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा विद्यापीठासाठी दीड वर्षानंतर संविधानिक, शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार एकूण 38 पदांना मंजुरी देण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. मंजूर केलेल्या पदांपैकी 11 संविधानिक पदांमध्ये कुलगुरू, कुलसचिव, चार अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, ज्ञानस्रोत केंद्र संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ संचालक, विद्यार्थी विकास संचालक, वित्त व लेखा अधिकारी यांचा समावेश आहे. 14 शिक्षकीय पदांमध्ये दोन प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक आणि आठ सहायक प्राध्यापक आहेत, तर 13 शिक्षकेतर पदांमध्ये उपकुलसचिव, दोन सहायक कुलसचिव, दोन स्वीय सहायक, कार्यालय अधीक्षक, दोन संशोधन सहाय्यक, सहायक ग्रंथपाल, चार लिपिक व टंकलेखक यांचा समावेश आहे. विद्यापीठात पाच अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, पदवी स्तरावर मराठी लिपीशास्त्र आणि नाट्यशास्त्र, पदव्युत्तर स्तरावर अभिजात भाषा, समाजभाषा विज्ञान, बोली विज्ञान आणि मानसशास्त्र या अभ्यासक्रमांचे अध्यापन अभ्यागत प्राध्यापकांद्वारे सुरू करण्यात आले आहे. पहिल्या वर्षी 45 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, आता शासनाने या पदांना मंजुरी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button