कोंबड्यांच्या झुंजीवर 44 लाखांचा जुगार

छाप्यात तब्बल 92 आरोपींना अटक

गडचिरोली /22 सप्टेंबर : जिल्ह्यातील दुर्गम भागात कोंबड्यांच्या झुंजी लावून सुरू असलेल्या अवैध जुगारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा गरंजी टोला येथील जंगल परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 92 आरोपींना अटक करण्यात आली असून, 44 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोंबड्यांचा बाजार भरवून जुगार खेळवला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. स्थानिक नागरिकांना यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असल्याचीही माहिती समोर आली होती. या पोर्शभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व ठाण्यांना अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार 21 सप्टेंबर रोजी धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात गस्त घातली. जंगलात मोठ्या आवाजात गोंगाट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने जवळ जाऊन पाहणी केली असता कोंबड्यांची झुंज लावून पैज लावण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक पाहताच काही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दक्षता घेत 92 जुगारींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. यात 46 दुचाकी (अंदाजे किंमत 16 लाख 10 हजार), पाच चारचाकी वाहने (26 लाख), 31 मोबाईल फोन (1 लाख 70 हजार), 14 कोंबडे (3,200), लोखंडी काती (250) आणि रोख रक्कम 42,950 अशा मिळून तब्बल 44 लाख 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button