अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचीही सहमती

पुणे /22 सप्टेंबर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना 4 मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर म्हटले की, आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे, पण आता रिकामं ठेवू नका; जबाबदारी द्या, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. धनंजय मुंडेंच्या विधानासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटले की, धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल आणि त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल. तसेच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील म्हटले की, धनंजय मुंडे मला म्हणालेत की काम द्या; याचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. कारण त्यांनी राजीनामा दिला त्याची काही कारणं आहेत, तसेच न्यायालयीन प्रक्रिया व चौकशी चालू आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मागणीसंदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी, महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार एकत्र बसून निर्णय घेतील, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button