अंतरवली सराटी आंदोलनात शरद पवार गटाच्या आमदाराचा हात?

छगन भुजबळांचा खळबळजनक आरोप

-ओबीसी आरक्षणावरुन सरकारवरही टीका
नागपूर / 18 सप्टेंबर : मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नागपुरातील एका मेळाव्यात थेट शरद पवार यांच्या गटावर गंभीर आरोप करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
भुजबळ यांनी दावा केला की, 2 सप्टेंबर 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यावेळी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आपले आंदोलन सोडून परत गेले होते. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील एका आमदाराने त्यांना परत आणून बसवले. यामुळे आंदोलनाने अचानक पुन्हा उग्र रूप धारण केले, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला. शुक्रवारी नागपूर येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला समता परिषदेच्या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी हा आरोप केला.
भुजबळ म्हणाले, त्या बैठकीत पवार गटाचा आमदार उपस्थित होता. आंदोलनाशी हाताळणी करण्याऐवजी दगडफेकीची तयारी करण्यात आली होती. हे सर्व मराठा आंदोलनाच्या मागे राजकीय हेतू असल्याचे सूचक आहे. यावेळी भुजबळ यांनी महायुती सरकारवरही सडकून टीका केली. ओबीसींना धक्का बसल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, सरकारने नुकताच कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात घेतलेला निर्णय ओबीसी आरक्षणाला थेट धक्का देणारा आहे. आरक्षणाचा पाया हा सामाजिक मागासलेपणा आहे, मात्र त्याची दखल न घेता निर्णय घेणे ही गंभीर बाब आहे. हा शासन निर्णय सरकारने एकतर मागे घ्यावा किंवा त्यात सुधारणा करावी.

संबंधित बातम्या

Back to top button