अमरावतीला ‘स्मार्ट, स्वच्छ आणि सुंदर शहर’ बनविणार

मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांचा संकल्प

-‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात मनमोकळा संवाद
-जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आयोजन
अमरावती / 12 सप्टेंबर : अमरावतीचे नागरिक उत्साही व सकारात्मक आहेत. शहराचा विकास साधण्यासाठी ते सतत नवनवीन कल्पना घेऊन पुढे येतात. त्यांना प्रशासनाशी जोडून अमरावतीला अधिक चांगले, स्वच्छ आणि आधुनिक शहर बनविण्याचा माझा संकल्प आहे, असे स्पष्ट प्रतिपादन महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले. त्या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे वॉलकट कंपाउंड स्थित मराठी पत्रकार भवनात आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात बोलत होत्या.
सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची गरज अधोरेखित करत आयुक्त म्हणाल्या की, शहरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने मंजूर केला असून लवकरच ते कार्यान्वित होतील. शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पे- अँड- पार्किंग योजना लवकरच लागू होणार असून जागा निश्चित करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हॉकर्स झोनही निश्चित करण्यात आले आहेत. अमरावतीचे ऐतिहासिक व नैसर्गिक वैभव जतन करण्यावर भर देणार असल्याचे सांगून आयुक्तांनी वडाळी व छत्री तलावांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यासाठी आवश्यक परवानग्या घेऊन प्रकल्प पुढे नेण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
-नागरिकांच्या सहभागाने इंदौरसारखी स्वच्छता : स्वच्छतेच्या बाबतीत अमरावतीही इंदौरप्रमाणे यश मिळवू शकते, मात्र त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग गरजेचा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. नुकतेच अमरावतीने स्वच्छ आबोहवा पुरस्कार मिळवला असून तो नागरिक-प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व दहा स्मशानभूमीमध्ये सीएनजी आधारित दहन प्रणाली, तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिका शाळांची विद्यार्थी संख्या 13 हजारांच्या पुढे गेली असून त्या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, सीबीएसई पॅटर्न व आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाग-बगिच्यांची निगा राखण्यावरही प्रशासन लक्ष केंद्रित करणार आहे.
-महसूलवाढीसाठी ठोस पावले : मनपाची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्स वसुली प्रभावी करण्यात येईल. एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाईल. जाहिरातींमधून उत्पन्न वाढवण्यावरही भर दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
-आयएएस होण्याची प्रेरणादायी कथा
कार्यक्रमात सौम्या शर्मा चांडक यांनी आपल्या आयएएस बनण्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कथा सांगितली. मूळतः कायद्याचे शिक्षण घेत असताना अचानक यूपीएससी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर देशात नवव्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्या. कायद्याचे शिक्षण त्यांच्या आत्मविश्वासवृद्धीसोबत आज प्रशासनातील निर्णयक्षमतेत उपयोगी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुक्तांनी आपल्या आयुष्याविषयीही संवाद साधला. आयएएस प्रशिक्षणादरम्यान आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांच्याशी झालेल्या भेटीतून विवाहाचा निर्णय झाला. आज दाम्पत्य समन्वयाने जबाबदार्‍या सांभाळत असून त्यांना 9 महिन्यांचे अपत्य आहे.
-अनिल अग्रवाल यांनी मांडली पत्रकार संघाची अपेक्षा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पत्रकार भवनातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण महापालिकेने करावे, अशी अपेक्षा अनिल अग्रवाल यांनी सौम्या शर्मा यांच्याकडे व्यक्त केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल घवले यांनी तर संयोजन डॉ. लोभस गडेकर यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button