माझ्याविरोधात चालवण्यात आले ‘पेड पॉलिटिकल कॅम्पेन’

नितीन गडकरींचा धक्कादायक दावा

-ई-20 इंधनावरुन टीका
नवी दिल्ली/ 11 सप्टेंबर  : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या पेड पॉलिटिकल कॅम्पेनचा थेट खुलासा केला आहे. दिल्लीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 65 व्या वार्षिक संमेलनात गडकरी यांनी स्पष्ट केले की, काही महिने सुरू असलेली ई-20 इंधनावरील चर्चा आणि त्यावरून निर्माण झालेली टीका ही वास्तवापेक्षा जास्त भडकावलेली होती.
गडकरींच्या मते, सोशल मीडियावर मला राजकीयदृष्ट्या निशाणा बनवण्यासाठी एक कॅम्पेन चालवण्यात आले होते. ते एक पेड कॅम्पेन होते. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलविषयी (ई-20) अनेकांकडून वाहनांचे मायलेज कमी होण्याचे, इंजिनवर परिणाम होण्याचे आरोप केले जात होते. मात्र, गडकरी यांनी या अफवांवर ठामपणे स्पष्ट केले की, हे इंधन सुरक्षित आहे आणि नियामक संस्था तसेच ऑटोमोबाईल उत्पादक याचे समर्थन करतात.
केंद्रीय मंत्री म्हणाले, पारंपरिक पेट्रोलासोबत 20 टक्के इथेनॉल वापरणारे ई-20 पेट्रोल अनेकांकडून वाढवून चढवून सांगितले जात आहे, पण तांत्रिकदृष्ट्या हे इंधन उपयुक्त आहे. जुन्या, 2023 पूर्वीच्या उत्पादन कारमध्ये काही फरक जाणवू शकतो, पण हे ही सुरक्षित आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने यापूर्वीच सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, इंधनातील कमी एनर्जी डेन्सिटीमुळे मायलेजमध्ये किंचित फरक पडतो. ई-10 साठी रचना केलेल्या वाहनांसाठी फरक 1-2 टक्के आणि इतर वाहनांसाठी 3-6 टक्के इतका असतो. गडकरींचा दावा आणि ई-20 इंधनावरील स्पष्टीकरण हे सरकारच्या धोरणांना समर्थन देणारे असून, सोशल मीडियावरून चालवण्यात आलेल्या राजकीय मोहिमांना सुस्पष्ट उत्तर आहे.

संबंधित बातम्या

Back to top button