आमदार खोडके यांना व्याकरणाची समज नाही का?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा टोला

-त्रुटीपूर्ण जन्म-मृत्यू दाखले रद्द केल्याबद्दल समाधान
-संशयित दाखल्यांवर कठोर कारवाईची मागणी
-अचानक अमरावतीत दाखल, पोलीस आयुक्तांशी चर्चा
अमरावती / 9 सप्टेंबर : अमरावती शहरासह जिल्ह्यात बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांनी स्थानिक अधिकार्‍यांच्या संगनमताने गैरमार्गाने उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे काढल्याचे आरोप सातत्याने करणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज अचानक अमरावती शहरात दाखल झाले. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली तसेच शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासोबतही या प्रकरणावर चर्चा केली.
पोलीस ठाण्यातील चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मनपा क्षेत्रातील नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेली उशिराची जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मनपा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र याच दिवशी आमदार सुलभा खोडके यांनी प्रतिक्रिया देताना एकही दाखला रद्द होऊ देणार नाही असे वक्तव्य केल्याबद्दल विचारले असता सोमय्या म्हणाले की, कदाचित आमदार सुलभा खोडके यांना सरकारी पत्रव्यवहारातील भाषेचे व्याकरण समजत नसावे, किंवा आम्हालाच त्यांचे व्याकरण कळत नसावे. कारण प्रशासनाने स्पष्टपणे पत्रात नमूद केले आहे की नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने जारी दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रद्द न करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, त्यांनी सर्व पुराव्यांसह त्रुटीपूर्ण व नियमबाह्य दाखल्यांची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारींवर नियमाप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच या फर्जी प्रमाणपत्रांच्या आधारे ज्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून तो लाभ परत वसूल केला पाहिजे. बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांविरोधातील त्यांचा संघर्ष यापुढेही असाच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-लव्ह-जिहाद चालणार्‍यांना वोट-जिहादही चालतो
काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला होता की, ते जन्म प्रमाणपत्रांच्या मुद्द्याला हवा देऊन अमरावतीत वातावरण बिघडवत आहेत. यावर प्रतिउत्तर देताना सोमय्या म्हणाले की, काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना व शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष वोटबँक राजकारण करत आहेत. म्हणूनच हे पक्ष लव्ह-जिहादसारख्या गंभीर मुद्द्यावरही कधी आवाज उठवत नाहीत. अशा लोकांकडून वोट-जिहादविरोधात भूमिका घेण्याची अपेक्षाही करता येत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button