अजित कुंभार एमएआयडीसीचे नवे व्यवस्थापकिय संचालक

5 अधिकार्‍यांच्या नव्या नेमणुका जाहीर

-12 दिवसांत तिसर्‍यांदा मोठे फेरबदल
मुंबई / 26 ऑगस्ट : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपाठोपाठ राज्य सरकारकडून सनदी अधिकार्‍यांच्या वारंवार बदल्या करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली करून तेथील जबाबदारी वर्षा मीना यांच्याकडे सोपवली होती. आता कुंभार यांना नवे पद देण्यात आले असून त्यांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर अधिकारी विशाल नरवडे यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी 5 अधिकारी, 12 ऑगस्टला 7 अधिकारी आणि 20 ऑगस्टला आणखी 5 अधिकार्‍यांच्या बदल्या करून सरकारने शासकीय यंत्रणेत गतिमानता आणण्याचा प्रयत्न केला होता.
याचसोबत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील पदोपदी बढतीचे आदेशही काढण्यात आले आहेत. अलिबाग माहिती कार्यालयातील किरण वाघ यांची वरिष्ठ सहायक संचालकपदी मुंबईत नियुक्ती झाली आहे. यवतमाळचे मंगेश वरकड यांची वर्ध्यात माहिती अधिकारी म्हणून तर भंडार्‍याच्या शैलजा दांदळे यांची भंडारा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तसेच चंद्रपूरचे राजेश येसनकर आणि ब्रिजकिशोर झंवर यांनाही नवीन जबाबदा-या देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button