महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होणार उपराष्ट्रपती

एनडीएकडून उमेदवार, बैठकीत निर्णय आणि घोषणा

नवी दिल्ली/ 17 ऑगस्ट : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यांचे लक्ष एनडीए कोणाला उमेदवार म्हणून पुढे करते याकडे लागले होते. अखेर भाजपा मुख्यालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक प्रक्रिया वेग घेत आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट निश्चित झाली आहे. त्यामुळे शर्यतीला आता अधिकृत सुरुवात झाली असून विरोधकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तिरुपूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला आणि पुढे जनसंघ व भाजपाशी जोडले गेले.
1998 आणि 1999 मध्ये त्यांनी कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा विजय मिळवला. तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, केरळ प्रभारी अशा महत्त्वाच्या जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. 2016 ते 2019 पर्यंत ते ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2023 मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2024 मध्ये त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आता एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाल्याने दक्षिण भारताला नव्या पातळीवर प्रतिनिधित्व मिळाले आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राधाकृष्णन यांच्या अनुभवाचा फायदा एनडीएला या निवडणुकीत नक्कीच होणार आहे.
-पाच दशकांचा अनुभव
सीपी राधाकृष्णन गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ संघ, जनसंघ आणि भाजपाशी सक्रियपणे जोडलेले आहेत. संघटन बळकट करण्यासाठी विशेषतः दक्षिण भारतात त्यांनी मोठी भूमिका बजावली. साधेपणा, शेतकरी पार्श्वभूमी आणि कार्यकुशलता यामुळे त्यांना संघटनात आदराचे स्थान मिळाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button