15 ऑगस्टला छत्तीसगढमध्ये मशिदी आणि मदरशांवर फडकणार तिरंगा

वक्फ बोर्डाचा महत्त्वाचा आदेश

 * अध्यक्ष सलीम राज यांनी जारी केलं पत्रक

नवी दिल्ली/12 ऑगस्ट – 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. यंदाच्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान या दिवशी भारतातल्या एका राज्यात सगळ्या मदरशांवर आणि मशिदींवर तिरंगा ध्वज फडकणार आहे. छत्तीसगढ हे ते राज्य आहे. राज्य वक्फ बोर्डाने 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील मशिदी, मदरसे आणि दर्गा या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत. सलीम राज यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की छत्तीसगढ वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत ज्या मशिदी, मदरसे आणि दर्गा येतात, त्या ठिकाणी तिरंगा फडकवा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभक्ती, बंधुभाव आणि एकतेची ओळख सगळ्या देशाला पुन्हा एकदा करुन द्या असंही या पत्रकात म्हणण्यात आलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. सलीम राज म्हणाले तिरंगा आपल्या सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. काही मशिदींमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की तिरंगा ध्वजाचा सन्मान हा कुठल्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तिरंगा फडकवण्यात कुणालाही काही आक्षेप असेल असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे या प्रकारचा आदेश देणं आवश्यक होतं असंही डॉ. सलीम राज यांनी म्हटलं आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button