रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ
मनी लाँड्रिंगप्रकरणी 58 कोटी कमावल्याचा आरोप

* ईडीच्या आरोपपत्रात ठपका
नवी दिल्ली/10 ऑगस्ट – काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने(एऊ) मनी लाँड्रिंग प्रकरणात रविवारी(दि.10) वाड्रांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. वाड्रा यांनी दोन कंपन्यांद्वारे 58 कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न मिळवले आणि ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि व्यावसायिक कर्जांची परतफेड करण्यासाठी वापरली, असा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीच्या आरोपपत्रानुसार, रॉबर्ट वाड्रा यांना दोन कंपन्यांकडून 58 कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न मिळाले, जे कथित गुन्हेगारी कारवायांशी संबंधित होते. त्यांनी ही रक्कम रिअल इस्टेट खरेदीकरण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या विविध कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. ईडीच्या आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, एकूण 58 कोटी रुपये रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे आले, जे दोन मार्गांनी आले आहे. यापैकी 5 कोटी रुपये ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (बीबीटीपीएल) द्वारे आणि 53 कोटी रुपये स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (एसएलएचपीएल) द्वारे हस्तांतरित केले गेले. दुसरीकडे, गुरुग्राममधील शिकोहपूर येथील 2008 च्या जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.




