रेव्ह पार्टी करताना एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

प्रांजल खेवलकरांसह सात जणांना बेड्या

-दोन महिलांचा समावेश, दोन दिवसांची पोलीस कोठडी
-राजकिय वर्तुळात खळबळ
-पार्टीस्थळी कोकेन, गांजा, दारु, बिअर
पुणे / 27 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रांजल खेवलकर, निखिल पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव आणि दोन महिला अशा एकूण सात जणांना पुणे न्यायालयामध्ये हजर केले असता, सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर 29 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील युक्तीवाद करतेवेळी म्हणाले, आरोपींकडे कोकिन, गांजा पदार्थ मिळून आले आहेत. हे सर्व पदार्थ कुठून खरेदी केले आहेत. यातून काही आर्थिक व्यवहार झालेत का? याबाबत तपास करायचा असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
त्यावर आरोपीचे वकीलाकडून युक्तीवाद करतेवेळी सांगण्यात आले की, प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थ सेवन केले नाही किंवा त्यांनी विकत आणले नाही. तसेच ही बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होईल. त्यामुळे प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली. या मागणीवर सरकारी वकिलांनी सर्व आरोप खोडून काढले. गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 2.70 ग्राम कोकेन सदृश्य पदार्थ, 70 ग्राम गांजा सदृश्य पदार्थ, हुक्का पॉट, दारू, बिअर बॉटल ,10 मोबाईल आणि दोन चार चाकी वाहन असे एकूण 41 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास प्रांजल खेवलकर हे त्यांच्या मित्रांबरोबप पार्टी करीत होते. याबाबत माहिती मिळाली असता, आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी त्या कारवाईमध्ये दारु, गांजा आणि हुक्का हा साठा आढळून आला आहे. तर या कारवाईमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात जावयावर कारवाई झाल्याने आता एकनाथ खडसेंवर टीका केली जाते आहे.
रेव्ह पार्टीत सहभागी सात जणांना तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आज पहाटे आणण्यात आले. त्यांच्या तपासणी अहवालातील माहिती समोर आली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सात जणांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू होती. त्यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन केले आहे का हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोघांनी मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहेत.
-असे घडण्याचा अंदाज होता : एकनाथ खडसे
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण आहे, त्यानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मलाही येत होता…कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसं त्यावर बोलणार नाही. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. परंतु या प्रकरणात पोलिस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू असही खडसेंनी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातम्या

Back to top button