धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागणार?

अजित पवारांनी दिले संकेत

-क्लिनचिट मिळाल्यानंतर हालचाली
पुणे / 25 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणी क्लीन चिट देण्यात आलीय. क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे पाहायला मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय.
धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावर आता त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. परंतु, जी काही बदनामी झाली ती झालीच. यातून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला हे भरून येऊ शकत नाही. त्यांच्या दुसर्‍या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे. ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल आणि ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वये संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ, असं म्हणत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार पुण्यात बोलत होते.
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिलाय. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध करणार्‍या दोन्ही याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत.
-कोकाटेंच्या मंत्रीपदाची निर्णय मंगळवारी
आपल्या विधानामुळे अडचणीत येणार राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा चर्चेने जोर धरलाय. अजित पवार येत्या मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळालीय. लातूरच्या घटनेत जखमी झालेले विजय घाडगे यांनी आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयासाठी वेळ मागितला आहे, असेही घाडगे म्हणालेत.

संबंधित बातम्या

Back to top button