जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते भिडले

विधानभवनाच्या लॉबीतच राडा, जोरदार हाणामारी

-आव्हाडांकडून आगपाखड, पडळकरांचे मौन
मुंबई / 17 जुलै : विधिमंडळ सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ काल समोर आला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे.
काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता. हकालचा वाद हा शिवागाळ करण्यापुर्यंत होता. मात्र, आज विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. यामुळं विधानभवन परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.
पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत असे आव्हाड म्हणाले. मला शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर, तुला मारुन टाकू अशा धमक्या दिल्याचे आव्हाड म्हणाले. मलाच मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप आव्हाड यांनी केला. विधानसभेत आमदार सुरक्षीत नसतील तर कशाला राहायचं आमदार? असा संतप्त सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तो मवाल्यासारखा येतो आणि आमच्या आया बहिणीवरुन शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लॅग्वेंज म्हणून डिक्लेर करा ना असे म्हणत आव्हाडांनी पडळकरांवर टीका केली. सत्तेचा एवढा माज असे म्हणत आव्हाड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला याबाबत काही माहिती नसल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. त्याला जाऊन भेटा असे पडळकर म्हणाले. तो तिथं आहे, त्याच काय झालं तिथं जाऊन बघा, माझ्या ओळखीचा नाही असे पडळकर म्हणाले. तिथं गर्दी खूप आहे, नेमकं काय झालं याची मला माहिती नसल्याचे म्हणत पडळकर यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे.
-विरोधकांनी सरकारला घेरले
या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या आवारातच आमदारांना मारण्यासाठी गुंड आणले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर दुपारी केलेल्या एका पोस्टमध्ये पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्याकडून धमकीचे संदेश आल्याचा दावा केला. या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, असेही आव्हाड यांनी सांगितले. रोहित पवारांसह राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात काय सुरू आहे? सा प्रश्न विरोधांनी उपस्थित केला.
-पडळकरांच्या कार्यकर्त्याकडून आव्हाडांना धमकी
जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री कार्यालय, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस यांना टॅग करित एक पोस्ट केली आहे. गोपिचंद पडळकरांच्या कथित कार्यकर्त्याने आपल्याला धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक कार्यकर्त्याच्या धमकीचा स्क्रिनशॉटही जोडला आहे. यात म्हटले आहे की, ‘गोपी साहेबाच्या नादाला लागला तर तू मेला’, ‘तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती. पण साहेबांनी घातली नाही.’ तसेच या संदेशाबरोबर अश्लील शिवीगाळही करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button