‘उद्धव ठाकरे, तुमच्याकडे सत्ता बाकावर बसण्याची संधी आहे’
भर सभागृहात मुख्यमंत्र्यांची ऑफर

-सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
-ठाकरे म्हणाले…‘प्रसंग बाका आहे’
मुंबई / 16 जुलै: एकाबाजूला दिवसेंदिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकियदृषट्या जवळ येत असतानाच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाल्याचं पाहायला मिळाल. विधानपरिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. या समारंभादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाषण आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरला आहे.
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभ निमित्तानं भाषण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. अचानक भाषणादरम्यान त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना सत्तेची ऑफर दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2029 पर्यंत आम्ही तरी विरोधी बाकांवर बसणे शक्य नाही. पण, तुमच्याकडे सत्ताधारी बाकावर बसण्याची नक्कीच संधी आहे. महाराष्ट्रात दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही ऑफर दिली. ही ऑफर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दोन भावांसोबतच उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील अंतरदेखील कमी झाल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ऑफरला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात या गोष्टी खेळीमेळीनं होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायच्या असतात. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तर, याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपण ऑपरेशन केल्याचं सांगत नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ऑपरेशनचा माझ्या एवढा त्यांना अनुभव नाही. आम्ही सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो, ही आमच्या वडिलांची कृपा आहे. यावर बोलण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार नाही. ही आयत्या ताटावर बसलेली लोकं होती. खाल्ल्या ताटाची यांनी प्रतारणा केली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.




