माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे

ते दीपक काटेचे गॉडफादर

-प्रवीण गायकवाडांचा सनसनाटी आरोप
पुणे / 16 जुलै : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (13 जुलै) सोलापूरच्या अक्कलकोट इथं भ्याड हल्ला करण्यात आला. दीपक काटे याच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या तोंडाला काळं फासून धक्काबुक्की केली होती. या घटनेनंतर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता प्रवीण गायकवाड यांनी आज बुधवारी (16 जुलै) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेला हल्ला भाजपा पुरस्कृत असून याचा मास्टरमाईंड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून काही व्हिडिओदेखील दाखवले.
या घटनेतील मुख्य आरोपी दीपक काटे हा भाजपाच्या युवा मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस असून त्यानं अनेक वेळा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे माझे गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे. तसेच, बावनकुळेंनी देखील दीपक काटे याच्यामागे मी उभा असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. यामुळे माझ्यावर जो हल्ला करण्यात आला, त्याचा खरा मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज ठासून सांगितलं.
प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं, आम्ही ज्या विचारधारेचा प्रचार, प्रसार आणि अनुसरण करतो, त्या विचारधारेच्या विरोधात काम करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्याशी निगडीत वेगवगेळ्या संघटना अशा हल्ल्यांना बळ देतात किंवा त्यांची पाठराखण करतात. त्यासाठी बहुजन समाजातीलच तरुणांची माथी भडकावून त्यांना वापरलं जातं. वैचारिक प्रतिवाद करण्याची क्षमता संपते, तेव्हाच असे भ्याड हल्ले केले जातात. माझ्या काही हितचिंतकांनी मला महिन्याभरापूर्वीच याविषयी सूचित केलं होतं. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नागपूर येथील त्यांच्या एका बैठकीत पुरोगामी विचारांच्या संघटनांचा बंदोबस्त करण्याबाबत त्यांची चर्चा झाली आहे.
संघ आपली शंभरी अशा प्रकारे साजरी करणार आहे का? असा सवाल गायकवाड यांनी केला. हल्लेखोर दीपक काटे याचं असं म्हणणं होतं की, मी आमच्या संघटनेचं संभाजी ब्रिगेड हे नाव बदलावं, त्यातून संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो. यापूर्वीच मी त्याच्याशी दोनवेळा याबाबत चर्चा केली आहे. त्याला यातील तांत्रिक अडचणी समजावून सांगितल्या आहेत. तरीही त्यानं हा हल्ला केला, याचा अर्थ वैचारिक प्रतिवाद करण्यापेक्षा व्यक्तिगत शारीरिक हल्ला करून मला संपवणं हा त्यांचा डाव होता, असा आरोपदेखील गायकवाड यांनी केला.
जानेवारी 2025 मध्ये दीपक काटे हा पुणे विमानतळावर दोन पिस्तूल आणि 28 काडतूसांसह पकडला गेला होता. मात्र तपास अधिकार्‍यानं कर्तव्यात कुचराई करून दीपक काटेची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर आणली नाही असा आरोपही गायकवाड यांनी केला. त्याची माहिती लपवली. त्यानुसार न्यायालयानंही त्याला जामीन मंजूर करत असताना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आली नाही, असं म्हटलं. न्यायालयासमोर दीपक काटेची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी मांडली गेली असती तर दीपक काटेला जामीन मिळाला नसता. तपास अधिकार्‍यावर राजकीय दबाव असल्याशिवाय हे शक्य नाही. ज्या आरोपीला मोक्का लावून जेरबंद करायला हवं, त्याला आपल्या विरोधकांविरोधात आणखी गुन्हे करण्यासाठी सरकारनं मोकाट सोडलं, हेच यातून सिद्ध होतं. असे गायकवाड म्हणाले. संभाजी ब्रिगेड या हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button