विदर्भासह महाराष्ट्रात 7 दिवस मुसळधार पावसाचे
हवामान खात्याचा अंदाज, सतर्कतेचा इशारा

मुंबई / 5 जुलै: महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसानं ठिय्या मांडला असतानाच, हवामान खात्यानं पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर-पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात पुढील सात दिवस, पूर्व भारतात 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात 5 जुलै, हिमाचल प्रदेशात 7 जुलै आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत 6 आणि 7 जुलै रोजी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पूर्व आणि मध्य भारतात 5 ते 11 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, विदर्भ, छत्तीसगडमध्ये 5 ते 8 जुलै, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीममध्ये 5 आणि 8 ते 10 जुलै, अंदमान आणि निकोबारमध्ये 6 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये 5 ते 7 जुलै, महाराष्ट्रातील विदर्भात 7 ते 8 जुलै रोजी, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, ओडिशात 5 आणि 6 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पूर्व राजस्थानमध्ये 5 ते 11 जुलै, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, राजस्थानच्या पश्चिम विभागात 5, 6 जुलै आणि 10 ते 11 जुलै रोजी हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशात, तर 5 ते 9 जुलै रोजी जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशातील विविध भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7 ते 8 जुलै रोजी हिमाचल प्रदेश, 5 ते 7 जुलै रोजी उत्तराखंड, 6 आणि 7 जुलै रोजी पंजाब, हरियाणामध्ये, 5 आणि 9 ते 10 जुलै रोजी राजस्थानच्या पूर्व भागात अतिमुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, गुजरातमध्ये, तर 5 ते 7 जुलै रोजी सौराष्ट्र, कच्छमध्ये विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 6 ते 7 जुलै रोजी मराठवाडामध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. इशान्य भारतात पुढील सात दिवस अधिकांश भागांत विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मेघालयात 5 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.




