मी फायर की फ्लावर, हे आगामी निवडणुकीत समजेल
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

मुंबई / 5 जुलै: राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांचा मराठी विजयी मेळावा घेतला. या मराठी विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व हे 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं. पण ते आम्ही उठाव करून 2022 रोजी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढं नेत आहोत. आम्ही काम करणारी माणसं आहोत म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं. निवडणुकीत बहुमत दिलं. तुम्ही काम करत नाही म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलं. एकाला मराठीचा प्रेम आहे तर दुसरा सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी बसलेला… हा दोन्ही ठाकरे बंधूंतील फरक आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
याचबरोबर, त्यांचं (उद्धव ठाकरे) मराठीचं प्रेम हे बेगडी आहे. केवळ पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी…मराठी… करत आहेत. हिंदी सक्तीचा निर्णय हा त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता. त्यामुळं आजच्या सभेत सुरुवातीलाच याबाबत ते माफी मागतील, अशी आशा होती. मात्र त्यांनी तसं काही केलं नाही. पण, कोण झुकेगा आणि कोण उठेगा… हे येणार्या काळाच्या समजेल. एकनाथ शिंदे हा फ्लावर आहे की फायर हे पालिका निवडणुकीत समजेल, असा इशारा देखिल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.




