सफाई कर्मचार्यांच्या आवास, आरोग्याबाबत कार्य करावे
राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे आवाहन

अमरावती /27 नोव्हेंबर: स्वच्छता राखण्यात महत्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कर्मचार्यांच्या आवास आणि आरोग्याच्या बाबतीत यंत्रणांनी कार्य करावे, असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.
नियोजन भवनात सफाई कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डागोर म्हणाले, सफाई कर्मचार्यांच्या आवास योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी जिल्हास्तरावर अधिकृत अधिकारी नेमावा. त्यांच्याकडून या कर्मचार्यांना निवासाची सुविधा उभारण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. त्यासोबतच सफाई कर्मचारी जोखीमीचे काम करीत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. यासाठी निश्चित कालावधीनंतर संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात यावी. आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी सर्व कर्मचार्यांचे आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे त्यांना कॅशलेस सुविधा मिळण्यास मदत होईल. तसेच कर्मचार्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षेचाही लाभ देण्यात यावा. प्रामुख्याने वेतन जमा होणार्या बँका वेतन खात्यावर विविध सुविधा देतात. त्यामुळे या सुविधांचा लाभ घेण्यात यावा. सफाई कर्मचार्यांनाही सुट्टीचा अधिकार असून इतर कर्मचार्यांप्रमाणे त्यांनाही सुट्ट्या द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी शिबीरे आयोजित करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. डागोर यांनी दिल्या.





