लोकसभा-विधानसभा मतदारसंघांमध्ये 50 टक्के वाढ होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत

नवी दिल्ली/27 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘डिलिमिटेशन विधेयकां’वरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवून 850 पर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकार डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याने विरोधी पक्ष आणि दक्षिण भारतातील राज्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र असे असतानाच लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेष अधिवेशनाची केंद्र सरकारकडून गुरुवारी (26 नोव्हेंबर) घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आज (27 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयक मंजूर देखील करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 45 मिनिटे चाललेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता सर्व राज्यांमधील जागांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ होईल. याव्यतिरिक्त, हे विधेयक आणल्यामुळे महिला आरक्षणाशी संबंधित कायद्यात बदल करणे आवश्यक ठरेल. डिलिमिटेशन विधेयकामुळे लोकसभेतील जागांची कमाल संख्या 850 पर्यंत वाढवण्याचा आणि महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव आहे, जे 2029 च्या निवडणुकांपूर्वी अंमलात येईल.
डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित केल्या जातील. याव्यतिरिक्त, या विधेयकाच्या मंजुरीमुळे लोकसभेच्या जागांची संख्या वाढेल आणि महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल. दरम्यान, यापूर्वी एप्रिल महिन्यात आवश्यक बहुमत न मिळाल्यामुळे हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. मात्र आता, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीसमोर या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचे आव्हान असणार आहे.
महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी
दरम्यान, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, जर सीमांकन विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने मंजूर झाले, तर महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू होईल. सध्या या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, सर्व राज्यांमधील लोकसभा जागांमध्ये 50 टक्के समान वाढ करण्याची तरतूद आहे, तर जागांचे सध्याचे प्रमाण 2051 पर्यंत कायम ठेवले जाईल.





