श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील काकड आरतीची भक्तिमय वातावरणात सांगता

वारकरी परंपरेचे दर्शन

अंजनगाव सुर्जी/25 नोव्हेंबर : शहरातील गणेश नगर परिसरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात कार्तिक महिन्यानिमित्त सुरू असलेल्या पारंपरिक काकड आरती सोहळ्याची कार्तिक पौर्णिमेला भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. महिनाभर पहाटेच्या वेळी भूपाळी, घंटानाद आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडले. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित प्रभातफेरी आणि महाप्रसादामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
हिंदू धर्मपरंपरेत कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व असून, या काळात पहाटे स्नान, देवदर्शन, नामस्मरण आणि काकड आरती करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार गणेश नगर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात महिनाभर नियमितपणे काकड आरती करण्यात आली. पहाटेच्या शांत वातावरणात भाविकांनी हातात टाळ-चिपळ्या घेऊन हनुमंताचे नामस्मरण केले. भूपाळी, भजन, हनुमान चालीसा पठण आणि सामूहिक आरतीमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कापसाची जाड वात तुपात भिजवून तयार केलेल्या काकड्याच्या प्रकाशात पहाटे देवाची आरती करण्याची ही परंपरा श्रद्धा, शिस्त आणि सामूहिक भक्तीचे प्रतीक मानली जाते. आजच्या धावपळीच्या जीवनातही ही परंपरा नियमितपणे जपली जात असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या धार्मिक उपक्रमात विजय गुहे, राजेंद्र ईसाने, विजय मुधोळकर, आशिष चोपडे, अंकुश गुहे, जयप्रकाश काळमेघ, ऋषीकेश राऊत, आयुष पारे, संदीप कान्हेरकर, अथर्व चोपडे, देवेश तळोकार, अर्णव चौखंडे, आणि श्रीरंग वाघमारे, यांनी नित्यनेमाने सहभाग नोंदविला. ज्येष्ठांसोबत तरुण आणि लहान मुलांचाही सहभाग उल्लेखनीय ठरला. पूर्वीच्या पिढ्यांनी जपलेली धार्मिक परंपरा नव्या पिढीकडूनही श्रद्धेने पुढे नेली जात असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रभातफेरीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाचा गजर, भूपाळी आणि हनुमंताच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. प्रभातफेरीनंतर आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. अशा धार्मिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा, सामूहिक भक्ती आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन होण्यास हातभार लागतो. श्री संकटमोचन हनुमान मंदिरातील महिनाभर चाललेल्या काकड आरतीच्या या उपक्रमाची कार्तिक पौर्णिमेला भक्तिभावाने सांगता झाली. श्रद्धा, संस्कार आणि वारकरी संस्कृतीचा वारसा जपणारा हा सोहळा भाविकांसाठी भक्तीचा आनंददायी अनुभव ठरला.

Back to top button