हायड्रो प्रकल्पाला विरोध; आदिवासींच्या उपजीविकेवर संकट

240 हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार असल्याने प्रकल्प रद्द करण्याची संघर्ष समितीची मागणी

पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासह जंगलतोडीचा धोका

अमरावती /25 नोव्हेंबर – प्रस्तावित हायड्रो प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, तर आदिवासींच्या उपजीविकेवरही मोठे संकट ओढवणार आहे. प्रकल्पासाठी 240 हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार असून, सुमारे 1 लाख 50 हजारांहून अधिक झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे. जंगल नष्ट झाल्यास वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येईल, पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रभावित होतील आणि स्थानिक आदिवासींच्या जगण्याचा आधार हिरावला जाईल. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने केली आहे.
प्रकल्पाच्या विरोधात आज दुपारी संघर्ष समितीने बैठक घेत प्रशासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडली. प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होणार असून, पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली. जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम मानवासह वन्यजीवांवरही होतील, असे समितीने स्पष्ट केले. प्रकल्पामुळे परिसरातील आदिवासींचे स्थलांतर होण्याची शक्यता असून, त्यांच्या रोजगाराचे साधन आणि पारंपरिक जीवनपद्धती संकटात येणार आहे. याबाबत वन विभागाने खुलासा करावा, तसेच सरकारने पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करून प्रकल्पाबाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला बंड्या साने, भाकपचे सुनील घटाळे, किसान सभेचे सुशील ढोले, आदिवासी युवा क्रांती दलाचे जयंत वाढवे, आदिवासी महासभेचे नीळकंठ ढोके, सामाजिक कार्यकर्ते रामकिसन कासदेकर, सचिन गोरेले, किसान अखंडे आदी उपस्थित होते.

जंगल उजाडल्यास गावांचे अस्तित्व धोक्यात

प्रस्तावित प्रकल्पासाठी 240 हेक्टर वनक्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. सुमारे 1 लाख 50 हजार झाडे तोडली गेल्यास जंगलाचा र्‍हास, वन्यजीवांच्या अधिवासाचे नुकसान, पाण्याच्या स्रोतांवर परिणाम आणि आदिवासींच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे प्रकल्प रद्द करून वनसंपत्ती आणि स्थानिकांचे हक्क जपावेत, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.

Back to top button