50 लाखात नवजात बाळाचा सौदा ठरल्याची माहिती उघड
डॉ. वैशाली भोजने बाल तस्करी प्रकरणात अधिक खुलासा

श्रीमंत निपुत्रिक उद्योजक दाम्पत्याला बाळ विकण्याचा डाव
बुटी प्लॉट येथील रुग्णालयात प्रसूतीचा बनाव
अमरावती/24 नोव्हेंबर– अमरावती शहरातील बहुचर्चित बाल तस्करी आणि विक्री प्रकरणात रोज नवे आणि धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. या संतापजनक प्रकारात एका नवजात बाळाचा तब्बल 50 लाख रुपयांत सौदा ठरल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉ. वैशाली भोजने हिने चौकशीदरम्यान राज्यातील दुसर्या जिल्ह्यातील एका निपुत्रिक उद्योजक दाम्पत्याला हे बाळ देण्याची बोलणी झाल्याची कबुली दिली आहे. या नव्या माहितीमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.
अमरावती शहराला हादरवून सोडणार्या या बाल विक्रीच्या रॅकेटमध्ये आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलीस कोठडीत असताना आरोपी डॉ. वैशाली भोजने हिने या व्यवहाराबद्दल अनेक गुपिते उघड केली. राज्यातील दुसर्या जिल्ह्यात राहणार्या एका श्रीमंत उद्योजक दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने त्यांनी बाळ दत्तक घेण्याऐवजी थेट विकत घेण्याचा मार्ग निवडला होता. या दाम्पत्यासोबत 50 लाख रुपयांत नवजात बाळ देण्याचा व्यवहार ठरला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा अचानक उद्भवलेल्या कारणामुळे हे बाळ त्यांच्या ताब्यात दिले गेले नाही. हा केवळ तोंडी सौदा होता की प्रत्यक्षात बाळाची देवाणघेवाण झाली होती याचा कसून शोध आता पोलीस घेत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात आरोपींनी अत्यंत चलाखीने कायद्याच्याडोळ्यांत धूळ फेकण्याचा डाव आखला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित उद्योजक दाम्पत्याला अमरावती शहरात बोलावून घेण्यात येणार होते. त्यानंतर बुटी प्लॉट परिसरातील भोजने प्रसूती आणि उपचार केंद्रात या महिलेची नैसर्गिक प्रसूती झाल्याचा खोटा बनाव रचण्याची योजना तयार होती. रुग्णालयाच्या कागदपत्रांत फेरफार करून हे तस्करीचे बाळ त्यांचेच असल्याचे दाखवून त्यांना सुपूर्द करण्याचा हा मोठा कट होता. फ्रेजरपुरा पोलीस आता त्या उद्योजक दाम्पत्याची नेमकी ओळख पटवणे आणि त्यांच्यात झालेले संभाषण तसेच पैशांच्या व्यवहाराचे पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. या प्रकरणात डॉ. वैशाली भोजने आणि तिचा पती प्रफुल्ल भोजने यांच्यासह आतापर्यंत एकूण 12 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या मुख्य आरोपींची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 4 नवजात बालकांची सुखरूप सुटका केली असून त्या सर्व बाळांना सुरक्षिततेसाठी होलीक्रॉस शिशुगृहात ठेवण्यात आले आहे. कारागृहात जाण्यापूर्वी डॉ. वैशाली भोजने हिने दिलेली ही माहिती तपासाची दिशा बदलणारी ठरली आहे. या 50 लाखांच्या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग होता आणि इतर जिल्ह्यांतही या टोळीचे जाळे पसरले आहे का याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
पोलिसांसमोर तपासाचे अनेक अनुत्तरित पेच-या प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा संशय बळावला आहे. संबंधित खरेदीदार उद्योजक दाम्पत्य नेमके कोण आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या व्यवहारामध्ये पैशांची देवाणघेवाण नेमकी किती झाली आणि मध्यस्थी करणारे इतर साथीदार कोण आहेत याचे धागेदोरे पोलीस जोडत असून लवकरच आणखी काही मोठ्या नावांचा खुलासा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





