समृद्ध पंचायत अभियान पुरस्कारांचा आज गौरव सोहळा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन, सावळी ग्रामपंचायतीला 1 कोटींचे पहिले बक्षीस

अमरावती /20 नोव्हेंबर– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कठोरा येथील पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, अमरावती विभागातील उत्कृष्ट काम करणार्या ग्रामपंचायतींना कोट्यवधींच्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मृद व जलसंधारणमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील, कामगारमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश पुंडकर, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न व औषध प्रशासनमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय अमरावतीच्या महापौर श्रीचंद तेजवानी, खा. डॉ. अनिल बोंडे, खा. बलवंत वानखडे, खा. अमर काळे, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, धीरज लिंगाडे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, किरण सरनाईक, संजय खोडके, आ. सुलभा खोडके, केवळराम काळे, राजेश वानखडे, रवी राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे आणि ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित राहणार आहेत. विभागीय स्तरावरील पुरस्कारांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सावली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे 1 कोटी रुपये, अमरावती जिल्ह्यातील पार्डी ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे 80 लाख रुपये, तर अमरावती जिल्ह्यातील एरंडगाव ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे 60 लाख रुपये मिळणार आहेत. अमरावती जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये घोडगाव ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे 50 लाख रुपये, चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे 30 लाख रुपये, तर अचलपूर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे 20 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या सोहळ्याला विभागातील पाचही जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलस्तरीय अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारीही सहभागी होणार असल्याची माहिती सत्यम गांधी यांनी दिली.





