जन्माआधीच नवजात बाळांचा सौदा केल्याचे उघड

डॉ. वैशाली भोजने दाम्पत्यांच्या कारनाम्याचा नवीन भांडाफोड

अकोला जिल्ह्यातून आणखीन एका बाळाला घेतले ताब्यात

4 नवजात बालक सुखरूप; 2 बाळांचा शोध सुरु

दवाखानाच्या नोंदवहीत खोट्या पालकांची नावे

मनपाचा बनावट जन्म दाखला मिळवणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

अमरावती/20 नोव्हेंबर- जन्माआधीच पोटातील बाळाचा सौदा करून दवाखान्याच्या नोंदवहीत खर्‍या आई-वडिलांऐवजी खरेदीदारांचे नाव लावून महापालिकेचा बनावट जन्म दाखला मिळवणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा फ्रेजरपुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने आणि प्रफुल्ल वसंतराव भोजने या पती-पत्नीसह 13 जणांना अटक झाली असून आज अकोला जिल्ह्यातून एका बाळाला सुखरूप ताब्यात घेतले आहे. कायदेशीर प्रक्रिया टाळून 6 बाळांची देवाणघेवाण झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी 4 बाळे ताब्यात घेतली आहेत तर उर्वरित 2 बाळांचा आणि त्यांच्या खर्‍या पालकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात 18 ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या मानव तस्करी आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्याच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (वय 49) आणि पती प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय 56, दोघे राहणार बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती) यांना न्यायालयाने यापूर्वी 16 आणि 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी मेरी ऊर्फ प्रतिभा संजय नगराळे (वय 45, राहणार राजुरा, अमरावती), डफरीन रुग्णालयातील कंत्राटी कामगार संगीता अशोक गवळी (वय 46, राहणार महाजनपुरा, अमरावती) आणि अमरावती जिल्ह्यातील अटक केलेल्या पती-पत्नीला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय आज अकोला जिल्ह्यातील एका पती-पत्नीलाही अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यानडॉ. वैशाली भोजने हिने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर संमतीने एकूण 6 बाळांची देवाणघेवाण केल्याची कबुली दिली आहे. यापैकी गुन्हा दाखल होताच 19 ऑक्टोबर रोजी पहिले बाळ ताब्यात घेतले होते. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातून दुसरे, 19 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातून तिसरे आणि आज 20 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातून चौथे बाळ पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले आहे. सुटका केलेल्या या लहानग्यांना न्यायालयाच्या आदेशाने बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, मयूर धांडगे, एक विधीसंघर्षग्रस्त बालक, निर्मल सरदार, मेरी ऊर्फ प्रतिभा संजय नगराळे, संगीता अशोक गवळी, वर्धा येथील महिला आणि पुरुष पालक, अमरावती येथील महिला आणि पुरुष पालक तसेच अकोला येथील महिला आणि पुरुष पालक अशा एकूण 13 जणांना अटक आणि ताब्यात घेण्यात आले आहे.
या टोळीतील प्रत्येक व्यक्तीची कामे ठरलेली होती. काही जण प्रसूतीसाठी येणार्‍या गरजू महिलांची आणि त्यांच्या घरच्या परिस्थितीची माहिती काढायचे. बाहेरील रुग्णालयात 20 हजार रुपये खर्च येईल आणि आमच्याकडे 10 हजारांत चांगला उपचार होईल असे आमिष दाखवून त्यांना भोजने रुग्णालयात आणले जायचे. बाळ जन्माला येण्याआधीच त्याचे ग्राहक ठरवले जायचे. दलाल निर्मल सरदार याला प्रत्येक व्यवहारामागे कमिशन मिळायचे. अडीच लाख रुपयांच्या व्यवहारात 50 हजार रुपये सरदार याच्या खिशात जायचे. इतकेच नाही तर दलाल निर्मल सरदार याने आपल्याकडील एका नवजात बाळाचा जन्म डॉ. भोजने यांच्या रुग्णालयात झाल्याचे कागदोपत्री दाखवून अमरावती महापालिकेकडून जन्म दाखला काढला होता. तो दाखलाही पोलिसांनी जप्त केला आहे.
दवाखान्याच्या नोंदवहीत खर्‍या पालकांऐवजी बाळ खरेदी करणार्‍यांची नावे चढवली जायची आणि तीच माहिती महापालिकेकडे पाठवून अधिकृत जन्म दाखला मिळवला जात असे. या प्रकरणामुळे आता या चिमुकल्यांच्या खर्‍या आई-वडिलांचा शोध घेणे आणि त्यांची जनुकीय चाचणी करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदार असलेला मुलगा आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तीबाबत डॉ. वैशाली हिने पती प्रफुल्ल भोजने याला एक पत्र लिहून दिले होते. राजापेठ पोलिसांत खोटी तक्रार देण्याचा त्यांचा डाव होता पण त्याआधीच फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ते पत्रही पोलिसांनी जप्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अमरावती शहर पोलिसांची सहा विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून ही पथके इतर जिल्ह्यांत रवाना झाली आहेत.

Back to top button