न्यायव्यवस्थेविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरून न्यायालयाची राऊतांना तंबी

स्वत: दिली माहिती

नवी दिल्ली/17 नोव्हेंबर : शिवसेना (ठाकरे) नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. भारताचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरून संजय राऊत यांच्यावर सध्या अवमानना कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीची माहिती संजय राऊत यांनी स्वत: दिली. यासंदर्भात त्यांनी द या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी न्यायालयाला सांगितले की, जरी संजय राऊत यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली असली, तरी त्यानंतरही त्यांनी सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पोस्ट केल्या आहेत. संजय राऊत ‘वारंवार चूक करणारे’ व्यक्ती आहेत, असे प्रदीप राय यांनी संबोधले. प्रदीप राय म्हणाले की, संजय राऊत एका प्रतिष्ठित पदावर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून काही जबाबदारीची अपेक्षा केली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. यावर न्यायमूर्ती कुमार म्हणाले की, इतक्या गंभीर प्रकरणात, माफी ही मनापासून असायला हवी, केवळ वरवरची नको. तसेच न्यायमूर्ती कुमार यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटले की, संजय राऊत तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात. आम्ही वकील असल्यापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही एक अनुभवी संसदपटू आहात आणि स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्राशीही संबंधित होतात. त्यामुळे, संयम कसा पाळावा, हे तुम्हाला माहीत असायला हवे.

Back to top button