खा.डॉ.अनिल बोंडे आंतरराष्ट्रीय संसदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

मनिला येथे 47 व्या आशियाई आंतरसंसदीय सभेत सहभागाची संधी

डिजिटल क्रांती, शेती आणि उद्योगांच्या विकासावर मांडणार भूमिका

अमरावती/17 नोव्हेंबर– अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे होणार्‍या 47व्या आशियाई आंतरसंसदीय सभेसाठी भारतीय संसदीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली आहे. 16 ते 22 नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या या आंतरराष्ट्रीय सभेत ते भारताची बाजू मांडणार आहेत. डिजिटल क्षेत्रातील प्रगती, शेतीमधील बदल, औद्योगिक विकास, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि भारत-फिलिपिन्समधील व्यापारवाढ अशा महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे डॉ. बोंडे यांची निवड ही अमरावती जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या सभेसाठी भारताकडून सहभागी होणार्‍या संसदीय प्रतिनिधीमंडळात डॉ. अनिल बोंडे यांच्यासह इतर भारतीय खासदार आणि संसद सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी वरुण चतुर्वेदी यांचा समावेश आहे. या दौर्‍यात डॉ. बोंडे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ. वसुधा अनिल बोंडे याही उपस्थित राहणार आहेत. या निवडीबद्दल डॉ. बोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या सभेत भारतातील डिजिटल क्रांती, कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल, उद्योग आणि उत्पादन क्षेत्राची प्रगती या विषयांवर विचार मांडले जाणार आहेत. यासोबतच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याची तयारी, आपत्ती व्यवस्थापन, भारत आणि फिलिपिन्समधील व्यापार संबंध, शेतीविषयक सहकार्य आणि माहिती तंत्रज्ञानातील भागीदारी यावरही चर्चा होणार आहे. आशियान ही दक्षिण-पूर्व आशियातील 11 देशांची संघटना असून, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि तिमोर-लेस्ते या देशांचा त्यात समावेश आहे. भारत या संघटनेसोबत राजकीय, आर्थिक आणि संसदीय संबंध मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. वर्ष 2000 पासून भारत या आंतरसंसदीय सभेत निरीक्षक म्हणून सहभागी होत आहे. दरम्यान, 23 व्या आशियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियान देशांतील तरुण खासदारांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाची घोषणा केली होती. या योजनेनुसार पुढील 5 वर्षांत आशियानमधील प्रत्येक सदस्य देशातील 2 तरुण खासदारांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. भारतीय लोकशाही आणि संसदीय कामकाजाची माहिती त्यांना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या प्रस्तावाला लोकसभा सचिवालयाची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर डॉ. अनिल बोंडे यांना मिळालेली संधी भारताचे संसदीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून अभिनंदन केले जात आहे.

Back to top button