मेळघाटातील धुंगरु बाजारात पोलिसांची जनजागृती मोहीम

बालविवाह रोखण्यासाठी आठ गावांत विशेष पुढाकार

अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी नागरिकांना कायद्याची माहिती

अमरावती/17 नोव्हेंबर- दिवाळीनंतर मेळघाटातील आदिवासीबहुल भागात भरणार्‍या पारंपरिक भोंगडू (धुंगरू) बाजारांच्या निमित्ताने अमरावती ग्रामीण पोलिसांनी बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीची विशेष मोहीम राबविली.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या सूचनेनुसार ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 गावांमध्ये जनजागृतीचे फलक लावून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कायद्याची माहिती देण्यात आली. पारंपरिक बाजारांमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव खरेदीसाठी येतात. याच गर्दीचा उपयोग करून पोलिसांनी नागरिकांपर्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचविला. मेळघाटात दिवाळीनंतर भरणार्‍या या बाजारांमध्ये खरेदी-विक्रीसोबतच आदिवासी नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात तरुण-तरुणींची ओळख होऊन विवाह जुळविण्याची परंपराही आहे. मात्र, कायद्याची पुरेशी माहिती नसल्याने बालविवाह आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. या मोहिमेंतर्गत 10 नोव्हेंबरला टिटंबा व कलमखार, 11 नोव्हेंबरला हरिसाल व सुसर्दा, 13 नोव्हेंबरला धारणी, 16 नोव्हेंबरला बिजुधावडी व बैरागड आणि 17 नोव्हेंबरला राणिगाव येथे जनजागृती करण्यात आली. पोलिसांनी नागरिकांना बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 यांची माहिती दिली. बालविवाह घडवून आणणे, त्याला मदत करणे किंवा अल्पवयीन मुलांवरील अत्याचार यासाठी होणार्‍या कारवाईबाबतही समजावून सांगितले. याशिवाय मद्यपान करून वाहन चालवू नये, दुचाकी चालविताना हेल्मेट वापरावे आणि व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले. मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेला आदिवासी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. पोलीस उपनिरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सलीम चव्हाण, संध्या चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल राठोड, नारायण धांडे, शंकरलाल कास्देकर, पोलीस हवालदार प्रकाश गिरडकर, पोलीस कर्मचारी सतीश राठोड, गणेश धुले, सुमित सुरजुसे, अनिल बेलसरे आणि मनोज लढे यांनी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

बालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार

मेळघाटातील 8 गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेत बालविवाह आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना कायद्याची माहिती देऊन अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. मद्यपान करून वाहन चालविणे आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालविण्याचे धोकेही समजावले. पारंपरिक बाजारांची संस्कृती जपत सामाजिक सुरक्षिततेचा संदेश देणार्‍या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Back to top button