अमरावती जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा?
परिसीमन बिल मंजुर झाल्यास अमरावती विभागात 45 विधानसभा तर 7 लोकसभा मतदारसंघ

लोकसभेचा विस्तार होण्याचे संकेत
वाशिम-अकोला जिल्ह्यातून लोकसभेचे दोन मतदारसंघ
लोकसभेसाठी 12 लाख, विधानसभेसाठी 2 लाख मतदारांचा अंदाज
महाराष्ट्रात 48 वरून 72 लोकसभा मतदारसंघ
विधानसभेची संख्याही 432 पर्यंत होण्याची शक्यता
अमरावती /17 नोव्हेंबर – देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या हालचालींना वेग आल्यास अमरावती विभागाच्या राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या 4 लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढून 7 होण्याचा अंदाज असून, विधानसभा मतदारसंघही 30 वरून 45 पर्यंत जाऊ शकतात. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील विधानसभा जागा 8 वरून 12 होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील मतदारसंघांचीही नव्याने आखणी होऊ शकते.
संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडले जाण्याची चर्चा आहे. देशातील लोकसभा जागा 543 वरून 850 पर्यंत वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सध्याच्या जागांमध्ये सुमारे 50 टक्के वाढ झाल्यास महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होऊ शकतात. त्याच धर्तीवर विधानसभेच्या जागाही 288 वरून 432 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या बदलासाठी सरकारला 361 खासदारांच्या पाठिंब्याची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 320 खासदार असल्याचा दावा केला जात आहे. अमरावती विभागात सध्या अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम असे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. नव्या रचनेत अमरावती उत्तर आणि अमरावती दक्षिण असे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. यवतमाळमध्येही दोन मतदारसंघ होण्याचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जागेत वाढ झाल्यास विभागातील लोकसभेच्या जागा 7 होऊ शकतात. विधानसभा मतदारसंघांच्या संभाव्य वाढीत अमरावती आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी 4, अकोल्यात 3, तर बुलढाणा आणि वाशिममध्ये प्रत्येकी 2 जागा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विभागातील एकूण जागा 45 होऊ शकतात. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, धामणगाव रेल्वे मतदारसंघांची सध्याची रचना बदलण्याची शक्यता आहे. यवतमाळमधील वणी, आर्णी, उमरखेड, तसेच बुलढाण्यातील मलकापूर मतदारसंघांच्याही सीमांमध्ये बदल होऊ शकतो. मात्र, ही सर्व संभाव्य गणिते असून अंतिम निर्णयानंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल.
वाढीव जागांमुळे राजकीय संधी वाढणार
अमरावती विभागात लोकसभेच्या जागा 4 वरून 7 आणि विधानसभेच्या जागा 30 वरून 45 होण्याचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात 8 ऐवजी 12 आमदार निवडले जाऊ शकतात. या बदलामुळे नव्या भागांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असून, राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचेही लक्ष मतदारसंघांच्या नव्या रचनेकडे लागले आहे. मात्र, अंतिम जागावाटप अधिकृत पुनर्रचनेनंतरच निश्चित होणार आहे.





