इंद्रदेव महाराजांनी 200 महिलांचे केले शोषण?
पीडितेची थेट वृंदावनामध्ये धडक

हिंदू महासभेसह विविध
संघटनांचा प्रशासनाला इशारा
महाराष्ट्रात एफआयआर दाखल
वृंदावन /17 नोव्हेंबर– महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज यांच्यावर 200 हून अधिक महिला आणि मुलींच्या शारीरिक शोषणाचे भयंकर आरोप करणार्या पीडित महिलेने आता थेट वृंदावनात धडक मारली आहे. महाराष्ट्रात शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या संतापजनक प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तिने कंबर कसली असून हिंदू महासभा, करणी सेना आणि भगवान परशुराम शोभायात्रा समिती या संघटना तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या ठाकल्या आहेत.
महाराष्ट्रात गुन्हा नोंदवल्यानंतर आता वृंदावन पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणांवर या प्रकरणाचा छडा लावण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आपल्यासोबत झालेल्या घृणास्पद अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि नराधमांना धडा शिकवण्यासाठी पीडित महिलेने थेट वृंदावन गाठले आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवण्याची आणि तिने सादर केलेल्या पुराव्यांची कसून पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. इंद्रदेव महाराज यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 200 हून अधिक निष्पाप महिला आणि मुलींच्या आयुष्याशी खेळ करत
त्यांचे शोषण केल्याचा स्फोटक आरोप या महिलेने केला आहे.
समाजातील बदनामीची भीती आणि दबावापोटी अनेक पीडित महिला अजूनही पुढे येण्यास धजावत नसल्याचे तिने ठणकावून सांगितले आहे. या प्रचंड दहशतीमुळे काही महिलांनी तर आपले घरदार सोडून पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित महिला वृंदावनात पोहोचताच हिंदू महासभा, करणी सेना आणि भगवान परशुराम शोभायात्रा समिती यांसह अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांनंतरही महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज यांनी अद्याप मौन बाळगले असून त्यांची कोणतीही बाजू समोर आलेली नाही. महामंडलेश्वर इंद्रदेव महाराज यांनी आपला विवाह आणि मुलांची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवल्याचा घणाघाती आरोप पीडित महिलेने केला आहे. विवाहित असूनही त्यांनी ही बाब लपवून ठेवली आणि आपल्यासोबत घडलेल्या या कथित प्रकारादरम्यान तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक दावाही तिने तक्रारीत केला आहे.





