जवानांवर हल्ला करणार्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा
इंडियन आर्मीने लगेच बदला घेतला

जम्मू काश्मीर/16 नोव्हेंबर -जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा मोठी मोहीम उघडली असून, कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे, 11 नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट्ट याचाही या कारवाईत मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून फरार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात घेराव घातला होता. अखेर सोमवारी (16 नोव्हेंबर) ही शोधमोहीम चकमकीत रूपांतरित झाली.कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार परिसरातील अकहरन भागात 11 नोव्हेंबर रोजी सीआरपीएफच्या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 46 व्या बटालियनचे तीन जवान जखमी झाले होते.





