भंडार्‍यात मुलींना रात्री बसमधून उतरवणे भोवले

वाहक चालक-वाहकांचे निलंबन, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची त्वरीत दखल

मुंबई/16 नोव्हेंबर –  सर्वसामान्यांच्या प्रवाशांच्या हक्काच्या लाल परीमधून चालक आणि वाहकांनी भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात दोन अल्पवयीन प्रवाशी मुलींना एसटीतून उतरवल्याचे समोर आल्यानंतर संबंधित बसचालक आणि वाहकांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, यापुढे अशा घटना घडल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा देखील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणार्‍या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने मोजके प्रवासी असल्याचे कारण पुढे करत दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या मिट्ट अंधारात वाटेतच उतरवून देणार्‍या बेजबाबदार कर्मचार्‍यांवर तीव्र संताप व्यक्त झाला. भंडारा येथून मुंढरी गावाकडे जाणारी एसटी बस रात्रीच्या सुमारास रोहा गावात पोहोचली. या बसमध्ये रोहा गावातून पुढे मुंढरीला जाण्यासाठी या दोन विद्यार्थिनींशिवाय इतर कोणताही प्रवासी नव्हता. केवळ एक-दोन प्रवासी आहेत या क्षुल्लक कारणावरून आणि स्वतःची सोय पाहण्यासाठी, मानवी संवेदनशीलता पूर्णपणे विसरलेल्या चालक-वाहकाने या दोन्ही विद्यार्थिनींना त्यांचा अंतिम थांबा येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी रोहा गावात रस्त्यावरच खाली उतरवून दिले. 14 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर सरनाईक यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली. याप्रकरणी संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांकडून प्राथमिक चौकशी करून संबंधित वाहक आणि चालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. एसटीच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार दोघांविरोधात पुढील कारवाई सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत, गावापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची आहे, कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांची मुलांप्रमाणे काळजी घ्यावी, असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत.

Back to top button