नागपूर पदवीधरसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात

2 लाख 55 हजार 603 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

2 हजारांवर अधिकारी व कर्मचार्‍यांनी नियुक्ती

नागपूर /22 ऑक्टोबर  : नागपूर येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतदानासाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण 445 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी मतदान पथके, अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्तीसह आवश्यक प्रशासकीय नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील एकूण 2 लाख 55 हजार 603 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 47 हजार 280 पुरुष, 1 लाख 8 हजार 301 महिला आणि 22 इतर मतदारांचा समावेश आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित निवडणूक साहित्य वाटप केंद्रावरून साहित्य घेऊन मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांकडे सुरक्षेसह रवाना झाली आहेत. शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांकडून कडक सुरक्षा व्यवस्था व आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 44 हजार 466 मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 32 हजार 262, गोंदिया जिल्ह्यात 22 हजार 176, वर्धा जिल्ह्यात 21 हजार 742, भंडारा जिल्ह्यात 21 हजार 349, तर गडचिरोली जिल्ह्यात 13 हजार 608 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांच्या संख्येतही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यात 246 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 58, वर्धा जिल्ह्यात 41, गोंदिया जिल्ह्यात 39, भंडारा जिल्ह्यात 35 आणि गडचिरोली जिल्ह्यात 26 मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागात एकूण 2 हजार 535 शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

Back to top button