शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने दोन कट्टर विरोधक एकत्र

आ. रवी राणा व आ. बच्चू कडूंच्या हस्तांदोलनाची सर्वत्र चर्चा

* अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचा प्रचार

अमरावती/22 ऑक्टोबर  : राजकारणात कोणीही कायमचा वैरी नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो, फक्त आपले हितसंबंध कायम असतात, हे तत्व त्रिकालाबाधित सत्य मानले जाते. त्याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातही येऊ लागला आहे. शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा हे महायुतीत असले, तरी त्यांच्यातील वैर हे सर्वश्रृत. पण, हे दोन कट्टर विरोधक गुरूवारी एकत्र दिसले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असला, तरी गोपनीय बैठका सुरू आहेत. महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक हे निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: अमरावतीत येऊन सभा घेतली. दरम्यान, आज येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांनी एकत्र येऊन चर्चा केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. जिल्ह्याच्या राजकारणात दोघे कट्टर शत्रू मानले जातात. त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
महायुतीत एकत्र असूनही बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दिनेश बूब यांना मैदानात उतरवले होते. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये कटुता वाढली होती. आरोप-प्रत्यारोप झाले. पण, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तने हे दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button